सोलापूर- पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता, जूनच्या शेवटच्या आठवड्य़ात एक पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील सीना नदीतिरावरील तिऱ्हे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी अडून राहण्यास मदत झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आभाळ भरून आले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे तिऱ्हे परिसरातील बळीराजाने आनंद व्यक्त केला आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्याने या परिसरात अल्प प्रमाणात पेरण्या झाल्या होत्या, ती पिकेही पावसाअभावी करपू लागली होती. आता झालेल्या या पावसामुळे ती पिके वाढीस मदत होणार असून मागास का होईना पंरतु पेरणीला आता वेग येणार आहे.
जलयुक्त 'गार'भवानी..! दीर्घ प्रतीक्षेनंतर सीना नदी परिसरात दमदार पाऊस - जलयुक्त शिवार
गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील सीना नदीतिरावरील तिऱ्हे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी अडून राहण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, जलयुक्त शिवार या योजनेतून येथील गारभवानी शिवारात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली होती. या पावसामुळे त्याचा फायदा झाला आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यास मदत झाली आहे. शिवारात पाणीच पाणी पहायला मिळाले, शिवाय रानातून वाहून जाणारे पाणी ओढे नाल्यामध्ये साठून ते जमिनीत मुरण्यास मदत होत असल्याची माहिती येथील शेतकरी गोविंद सुरवसे यांनी दिली. दीर्घ प्रतीक्षेनंतर परिसरात पाऊस झाल्यामुळे येथील चित्र जलयुक्त गारभवानी असे झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतकरी वर्गातून आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याबरोबरच, सीना नदीला पाणी येणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.