सोलापूर - कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या वतीने 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. देशातील विविध ठिकाणी याला पाठिंबा मिळाल्याचे चित्र आहे. राज्यात देखील सर्वत्र शांततेत आंदोलन पार पडत असताना माकपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मारहाण केल्याचे समोर आले.
काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना फरफटत देखील नेण्यात आले. या घटनेनंतर काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. एकंदरीत दिवसभर शांततेत चाललेल्या मोर्चाला पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण मोर्चाला हिंसक वळण लागले. यामुळे सोलापुरातील काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.
माजी आमदारसह माकपचे कार्यकर्ते व पदाधिकारी ताब्यात
कृषी विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दत्त नगरच्या मार्स्कवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालसमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर काहीच वेळात पोलिसांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमध्ये टाकण्यात आले. माजी आमदारसह माकपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांवर पोलीस मुख्यालयात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.