सोलापूर - प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे सांगत एमआयएमचे नगरसेवक रियाझ खरादी यांनी महापालिकेच्या आवारातच मुंडन करून निषेध नोंदवला.
एमआयएम नगरसेवकाचे सोलापूर महापालिका आवारातच मुंडन सोलापूर महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
सोलापूर महापालिका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचा विकास निधी मिळत नाही. यामुळे मुंडन आंदोलन केल्याचे रियाझ यांनी सांगितले. मात्र या विरोधाला पक्षातील अन्य नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.
एमआयएम नगरसेवक रियाझ खरादी यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील समस्या मांडत विकास निधी मागितला होता. त्यांच्या प्रभागातील रस्ते वीस वर्षांपासू खराब आहेत. सोशल हायस्कूल ते जिंदशाह मदार चौक, किडवाई चौक ते जेलरोड पोलीस स्टेशन हे रस्ते अद्याप चांगले झाले नाहीत.
या रस्त्यांच्या बाजूला दाट लोकवस्ती आहे. या रस्त्यांच्या विकास कामासाठी वेळोवेळी विकास निधी मागितला होता. तरी देखील आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुंडन करण्याच्या पर्यायावर अंमल केल्याचे त्यांनी म्हटले.
सोलापूर महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. आचारसंहिता असल्याने मला भ्रष्टाचाराची नावे सांगता येत नाहीत. पुढील महिन्यात येथील मालमत्तेवर व टॅक्स वसुलीमध्ये घोळ करणाऱ्यांची नावं भविष्यात सांगणार असल्याचे ते म्हणाले.