पंढरपूर (सोलापूर)- ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा तालुक्याला ओळखले जाते. त्यातच आता मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीचा भारतीय पोस्ट विभागाकडूनही विशेष सन्मान करण्यात आला आहे. पोस्टाने मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला प्रसिद्धी देण्यासाठी 'मंगळवेढा ज्वारी'चे छायाचित्र दर्शवणारा एक विशेष लिफाफा तयार केला आहे. शनिवारी पोस्टाचे जनरल जी. मधुमिता दास यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. पोस्टाकडून 'मंगळवेढा ज्वारी'चे प्रसिद्धी करण्यासाठी यामाध्यामतून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्याकडून मंगळवेढ्याच्या ज्वारीला भौगोलिक मानांकन-
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याला राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मंगळवेढा शिवारात पिकणारी ज्वारीची चवीला रुचकर आहे. तसेच या मालदांडी वाणाच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी आहे. मंगळवेढ्यातील जमिनीच्या वैशिष्ठ्यामुळे मालदांडी ज्वारीला उतार भरपूर पडतो. तसेच या ज्वारीची उत्पादन वाढावे या दृष्टीने मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबतची सविस्तर माहिती आत्मा, सोलापूरकडून देण्यात आली. तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.