महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका; भाजीपाला शेतातच करपला

By

Published : Mar 30, 2021, 6:51 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसत आहे.

farmers
शेतकरी शेतात काम करताना

सोलापूर - पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसत आहे. एकीकडे वाहतूक खर्च वाढला असून, दुसरीकडे मात्र भाजीपाला, कांदे, बटाटे, फळं यांचे दर कमीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करत आपला माल विकण्याची वेळ आली आहे. सोलापूर मार्केट यार्डात हवालदिल झालेले शेतकरी कमी भावात आपला माल विक्री करून निराश होत घरी परत जात आहेत. अतिशय विदारक परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण हटवल्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत गेली आहे.

शेतकऱयांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा -परमबीर सिंग यांच्या याचिकेवर ३१ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

अनेक पीकं शेतातच करपून जात आहेत-

नगदी पीक म्हणून भाजीपाला, फळे, कांदे आदी पीक शेतकरी आपल्या शेतात घेत आहेत. योग्य भाव आल्यावर बाजारात याची विक्री करून कर्ज फेडून कुटुंबाचा गाडा चालवू, अशी अपेक्षा अनेक शेतकरी बाळगून आहेत. पण अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. पण एक नवी समस्या समोर आली आहे, ती म्हणजे माल वाहतुकीत झालेली भाडेवाढ. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाडेवाढ देखील मोठी झाली आहे. मात्र, यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. कारण त्याच्या मालाच्या दरात कोणतीही भाववाढ झाली नाही. नगदी पीक घेण्याचं खर्च, वाहतुकीचा खर्च आणि मार्केट यार्डातील भाव या सर्व बाबींची बेरीज केली असता शेतात पिकवलेला माल हा शेतातच राहिलेला बरा, असा विचार शेतकरी बांधव करू लागले आहेत. त्यामुळे ही नगदी पीकं शेतात करपून जात आहेत.

शेतकरी शेतात काम करताना

हेही वाचा -चंद्रकांत पाटीलांचा महाविकास आघाडीत भांडण लावण्याचा प्रयत्न -जयंत पाटील

कासेगाव येथील शेतकऱ्याने टोमॅटो शेतातच फेकून दिले-

कासेगाव (दक्षिण सोलापूर) येथील सचिन गरड या शेतकऱ्याने तीन एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली होती. ज्यावेळी टोमॅटोची तोडणी झाली त्यावेळी बाजारात भाव घसरला होता. जवळपास दीड ते दोन लाख रुपये खर्च टोमॅटो लागवडीसाठी आला. ऐनवेळी 1 रुपया ते 3 रुपये प्रति किलो असे टोमॅटोचे भाव झाले आणि वाहतुकीचा खर्च देखील टोमॅटोच्या भावापेक्षा अधिक झाला. त्यामुळे सचिन गरड या शेतकऱ्यांने टोमॅटो शेतात फेकून दिले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव नसतो तर त्यात भर म्हणून मोटार वाहन धारकांनी वाढवलेली ही भाडेवाढ, यामुळे सोलापूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण खचून गेला आहे.

टोमॅटोचे शेत

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात रुपयात आणि कमी होतात पैशात -

केंद्र सरकारने इंधनावरील नियंत्रण हटवल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच गेले आहेत. ही दरवाढ रुपयांपासून सुरू होते आणि ज्यावेळी याचे दर कमी होतात ते मात्र पैशात. आता नुकतेच 24 दिवसांनी पेट्रोल 17 पैशांनी आणि डिझेल 18 पैशांनी कमी झाले आहे.

टोमॅटोचे शेत

लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात -

ट्रानसपोर्ट संघटना किंवा माल वाहतूक मोटार वाहन धारकांनी प्रति किलोमीटर भाडेवाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक चटके सहन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अजूनच आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर त्यात आणखीन भर म्हणून शेती मालाच्या वाहतूक खर्चात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

हेही वाचा -गृहमंत्री देशमुखांविरोधात केलेली कॉपी-पेस्ट याचिका ही 'स्वस्त प्रसिद्धी'साठी; उच्च न्यायालयाचे ताशेरे

ABOUT THE AUTHOR

...view details