सोलापूर -शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळा ( Gajanan Maharaj Palkhi ) सोलापुरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. सोलापूर मंगळवेढा या मार्गाने पालखी पंढरपूरात दाखल होणार आहे. दोन दिवस श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने सोलापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 53 वे वर्ष होते. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे पालखी पायी निघाली नव्हती. मात्र यंदा शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने शेगावहून पालखी वारकरी भाविकांसोबत निघाली. सोलापूर जिल्हा प्रशासनाने देखील या पालखीचे मोठ्या आनंदाने स्वागत केले होते. ( Gajanan Maharaj Palkhi arrive in Solapur )
सोलापुरात दोन दिवसांचा विसावा - श्री संत गजानन महाराज यांचा भव्य मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. गेल्या 53 वर्षांपासून शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगावहुन पंढरपूर कडे पायी जाते. हजारोंच्या संख्येने वारकरी भक्त या पालखी सोबत पायी असतात. जागोजागी वारकरी व विठ्ठल भक्त या पालखीची पूजा करून गुलाबपुष्प अर्पण करत पालखीचे स्वागत करतात. रविवारी 3 जुलै रोजी सोलापुरात गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले होते. शहरातील उपलप मंगल कार्यालय येथे संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम होता.दोन दिवसांच्या विश्रांती नंतर मंगळवारी दुपारी हजारो वारकरी आणि संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर कडे पायी रवाना झाली.
पालखीला सोलापुरात मोठा पोलीस बंदोबस्त -तुळजापूर मार्गे रविवारी श्री संत गजानन महाराज यांची पालखी भक्तिमय वातावरणात सोलापुरात दाखल झाली होती. सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी पूजा करून पालखीचे स्वागत केले होते. उप मंगल कार्यालय येथे दोन दिवस पालखीचा मुक्काम होता. मोठ्या सोलापुरातील विठ्ठल भक्तांनी व गजानन महाराज भक्तांनी दर्शन घेतले. सोलापूर शहर पोलिसांनी पालखीला व सोबत असलेल्या वारकरी भक्तांसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.