सोलापूर - छत्रपती शिवाजीमहाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. चक्कर आलेल्या रुग्णाची कोरोना टेस्ट सुरुवातीला पॉझिटिव्ह आली आणि बारा दिवस उपचार केल्यानंतर रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र त्याचा अचानक मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी पुन्हा त्याला पॉझिटिव्ह घोषित केले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांत मात्र संतापाची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून मृत रुग्णाचे नातेवाईक संभ्रमात पडले आहेत.
निगेटिव्ह आलेला रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह कसा?
चक्कर आल्यामुळे उपचारासाठी दाखल केले आणि आरटीपीसीआर टेस्टमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. हिम्मतलाल दस्तगिर शेख (वय 54, रा. भाग्यलक्ष्मी नगर, नई जिंदगी, सोलापूर) यांना 7 मार्च रोजी राहत्या घरी चक्कर आली होती. चक्कर का आली याचा उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी ताबडतोब त्यास कोरोना वॉर्डात उपचारासाठी दाखल केले. तबल 12 दिवस उपचार केले. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी 17 मार्च रोजी रॅपिड टेस्ट केली. त्यामध्ये कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हिम्मतलाल शेख यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली.