सोलापूर- सोलापुरात करण म्हेत्रे या सामाजिक कार्यकर्त्याचा 15 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेस 16 मे रोजी मोठी गर्दी झाली होती. कोविड नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस प्रशासनाने अंत्ययात्रेस उपस्थित असणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच करण म्हेत्रे यांचा मृत्यू कोरोना विषाणूची लागण झाल्यामूळे झाला होता अशी माहिती समोर आली आहे आणि म्हेत्रे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. विद्याधर सूर्यवंशी यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड रुग्ण म्हणून दोन खासगी रुग्णालयात म्हेत्रेंना केले दाखल
करण म्हेत्रे यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती आणि तशी माहिती कोविड कन्ट्रोल रूमला देखील देण्यात आली होती. म्हेत्रे यांना 24 एप्रिलला शहरातील मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 एप्रिलपर्यंत त्यांचायवर उपचार करण्यात आले. 27 एप्रिलपासून 15 मेपर्यंत म्हेत्रे यांच्यावर शहरातील विनीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 15 मे रोजी म्हेत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र उपचार करणाऱ्या विनीत हॉस्पिटलकडे कोविड उपचार परवानगी नसल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पालिका प्रशासन नातेवाईकासमोर अंतिम संस्कार करते. तरी देखील विनीत हॉस्पिटलने म्हेत्रे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनीत हॉस्पिटलचे मालक डॉ. विद्याधर सुर्यवंशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर डॉ. सुर्यवंशी हे आयुर्वेदिक विषयात एमडी डॉक्टर आहेत, तरी देखील त्यांनी ऑलोपॅथिक उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच विनीत हॉस्पिटल सील करणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.