सोलापूर - शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटल येथे 50 बेडच्या सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोलापूर शहरासाठी या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत, असे महापौर श्रीकांचना यन्नम मत व्यक्त केले.
कोविड रुग्णांसाठी अद्यावत सुविधा करण्यात येत असून त्याची पाहणी सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते श्रीनिवास करली, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी शीतल जाधव यांनी केली.
या ठिकाणी दोन हॉलमध्ये एकूण 50 बेडची सुविधा ऑक्सिजनसह करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी ऑक्सीमीटर बसवण्यात आले असून ऑक्सिजनचे साहित्य लवकरच बसवण्यात येईल. येत्या आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी सोलापूर शहरात महापालिकेच्या विविध हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी अशाच अद्ययावत सुविधा पुरविण्यात याव्यात त्याबद्दल वेळोवेळी आम्ही प्रशासनाशी चर्चा केली आहे. तरी आता बॉईज हॉस्पिटल येथे 50 बेडची अद्यावत सुविधा करण्यात येत असून नागरिकांची चांगलीच सोय येथे होणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी हॉस्पिटल येथील डॉक्टर,नर्स तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.