महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरातील हेरिटेज एनजी मिल वाचविण्यासाठी नीलम गोऱ्हेंची पुण्यात बैठक - Meeting in Pune regarding Heritage Vastu

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरातील नरसिंग गिरजी मिल (NG मिल) व हेरिटेज वास्तू संदर्भात पुण्यात गुरुवारी बैठक घेतली.

एनजी मिल

By

Published : Jul 25, 2019, 9:43 PM IST

Updated : Jul 26, 2019, 12:01 AM IST

सोलापूर -विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरातील नरसिंग गिरजी मिल (NG मिल) व हेरिटेज वास्तू संदर्भात पुण्यात गुरुवारी बैठक घेतली. यावेळी नरसिंग गिरजी मिलमधील हेरिटेजसह पुरातन इमारती वाचविण्यासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

सोलापुरातील नरसिंग गिरजी मिल (NG मिल) व हेरिटेज वास्तू

महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाने २२ जून २०१९ ला मिल पाडकामाची निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे अनेक संघटनांनी यावर आक्षेप नोंदविला आणि गोऱ्हे सोलापुरात आल्या असताना त्यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यावर गोऱ्हे यांनी लवकरच आढावा बैठक घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आज पुण्यात बैठक घेण्यात आली. बैठकीत सीमंतिनी चाफळकर यांनी त्यांचा प्रस्ताव चलचित्राच्या सादरीकरणाद्वारे मांडला.

बैठकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी या जागेचा विनियोग करण्यासाठी चार पर्याय मांडले. त्यामध्ये कुर्डुवाडी येथे मंजूर असलेली रेल्वे कार्यशाळेला जागा उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने इतर जिल्ह्यामध्ये नेण्याऐवजी या जागेमध्ये सुरू करावे. तसेच नरसिंग गिरजी मिलच्या २७ एकरवर ५३ इमारती आहेत. त्यापैकी ५ ते ६ इमारती या हेरिटेज आहेत. या इमारती अंदाजे ७ एकर जागेत आहे. पर्यटन महामंडळाचे कार्यालय या जागेत सुरू करुन यात्री निवास येथे केल्यास अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर व गाणगापूर तीर्थक्षेत्रांना जाण्याचा निमित्ताने सोलापुरात येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होऊ शकते. ही जागा रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड दरम्यान असल्याने प्रतिसाद देखील चांगला मिळू शकतो. व्यापारी संकुल निर्माण करता येऊ शकतात, असे कोठे म्हणाले.

हेरिटेज वास्तूंमध्ये टेक्सटाईल विभागाचे कार्यालय, त्यासंदर्भातील स्थित्यंतरे दाखविणारे संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करुन वास्तूंचे जतन करता येऊ शकते. त्याचबरोबर जी ७ एकर जागा हेरिटेजमध्ये गेल्याने वस्त्रोद्योग खात्याचे नुकसान होणार आहे. त्याकरता तेवढ्या चौरस फुटाचे टीडीआर किंवा एफएसआय पालिकेकडून वाढवून देता येऊ शकेल. याशिवाय ७ एकरमध्ये असलेल्या ३१२ गिरणी कामगारांची घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी महसूल विभागाने १० कोटींची मागणी केली आहे. त्यापैकी ५ कोटी कामगारांकडून तर ५ कोटी वस्त्रोद्योग महामंडळाकडून भरावयाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोऱ्हे यांनी देखील तशा आशयाचे पत्र लिहून ती मागणी मान्य करण्याबाबत संबंधितांकडे आग्रह करणार असल्याचे सांगितले.

बैठकीस विभागीय आयुक्त मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपसंचालक सोनवणे, वस्त्रोद्योग विभागाचे देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, इंटॅक सोलापूरच्या सीमंतिनी चाफळकर, मनपा नगररचना विभागाचे लक्ष्मण चलवादी, महेश क्षीरसागर आणि नगर भूमापन अधिकारी किरण कांगने उपस्थित होते.

Last Updated : Jul 26, 2019, 12:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details