सोलापूर -सातारा (Satara) जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ (Shirval) गावातील क्रांतीसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 मार्चला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चार पोलिसांनी वस्तीगृहात (Police Beaten Students in shivral) घुसून मारहाण केली. संबंधित पोलीस दारूच्या नशेत होते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
सुहास विजय कदम - अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून सर्व विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. तरी त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज (11 मार्च) सोलापूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषद घेऊन सातारा पोलीस दलातील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप-
सातारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या 17 विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. वैभव कळसे यांनी निषेध व्यक्त करत सातारा येथे आंदोलन देखील केले आहे. तसेच राज्यभरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर जखमांचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध-
आज 11 मार्च रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सोलापुरात विद्यार्थी मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषद घेऊन सातारा पोलीस दलातील त्या पोलिसांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राहुल कवडे, शहराध्यक्ष निशांत सावळे, उपजिल्हाध्यक्ष प्रतीक पवार, उत्तर सोलापूर कार्याध्यक्ष गणेश बचुटे, जिल्हा सरचिटणीस गौरव बरकडे, उप शहराध्यक्ष अक्षय जाधव, मिथुन लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.