महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे कर्करोगाने निधन - कर्करोग

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना पोटाचा कर्करोग होता. आज सैफी रुग्णालयात दुपारी त्यांचे निधन झाले.

हनुमंत डोळस १

By

Published : Apr 30, 2019, 3:37 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस (वय ५८) यांचे मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. त्यांना पोटाचा कर्करोग होता. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती हळहळू बिघडत गेली. आज सैफी रुग्णालयात दुपारी त्यांचे निधन झाले.

हनुमंत डोळस यांचा जन्म १/६/१९६२ दसूर, ता. माळशिरस येथे झाला होता. त्यांनी बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, दसूर आणि पाचवी ते सातवीचे शिक्षण बोंडले येथे घेतले. माध्यमिक शिक्षण त्यांनी विवेक वर्धनी, पंढरपूर येथे पूर्ण केले.

वयाच्या चौथ्या महिन्यात आईचे निधन तर, वयाच्या आठव्या वर्षी वडीलांचे छत्र हरपले. शिक्षणासाठी मुंबईत गेल्यानंतर त्यांनी वेटर म्हणून हॉटेलमध्ये नोकरी केली होती. विजयसिंह मोहिते पाटील १९८० मध्ये आमदार झाल्यावर त्यांच्याशी जवळीक वाढली. १९८२ मध्ये युवक काँग्रेसचे बोरिवली शाखेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची १९८५ मध्ये मुंबई शहर युवक काँग्रेस कार्यकारणीवर निवड झाली.

२४ जुन १९९९ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर डिसेंबर १९९९ मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी माळशिरसमधून निवडणूक लढवत हनुमंत डोळस आमदार झाले होते. २००९ मध्ये माळशिरस मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून ते विजयी झाले. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा माळशिरस मतदार संघातून ते निवडून आले होते. मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ आणि ४ बहिणी असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details