सोलापूर- देशात प्रचंड इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर शंभरीजवळ गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारने खतांचे दर वाढवत शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. 17 मे) धरणे आंदोलन करण्यात आले.
खत दरवाढीमुळे शेतकरी संकटात
10.26.26 या खतांच्या किंमती 600 रुपयांनी वाढवल्या आहेत. डिएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी 1 हजार 185 रुपयाला होता, तो आता 1 हजार 900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 खतांचे पन्नास किलोचे पोते 1 हजार 175 रुपयांचे होते. ते आता 1 हजार 775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किंमती वाढविल्या आहेत. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम भाजपच्या केंद्र सरकारने केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून लवकरात लवकर वाढवलेले दर मागे घ्यावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिला आहे.