सोलापूर - देशात काही झुंडीकडून मुस्लीम आणि दलितांना लक्ष्य केले जात आहे. मागील ५ वर्षांपासून दर महिन्याला सरासरी ७ ते ८ ठिकाणी मुस्लीम युवकांना फॅसिस्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात मुस्लीम समुदायाच्यावतीने महाआक्रोश आंदोलन करण्यात आले.
सोलापुरात झुंडबळीविरोधात मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन - महाआक्रोश आंदोलन
देशात मॉब लिचिंगच्या घटनात वाढ झाल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात मॉब लिचिंग विरोधात मुस्लीम समुदायाचे महाआक्रोश आंदोलन केले.
देशातल्या जवळपास १५ राज्यांमध्ये मॉब लिचिंगच्या घटनात वाढ झाली आहे. काही वृत्त संस्थांच्या म्हणण्यानुसार या घटनात २०० ते अडीचशे लोकांचा बळी गेला आहे. हिंसेसाठी आधी गो राष्ट्रवाद आणि आता जय श्री राम च्या घोषणा या झुंडीचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. या सर्व घटना राजकीय हेतूने प्रेरित असून त्या सत्ताधाऱ्यांशी निगडीत आहेत. २ जून २०१४ ला पुण्यात सुरू झालेल्या मॉब लिचिंगच्या घटनेत सोलापूरच्या मोहसीन शेखचा बळी गेला. त्याच क्रूर कृत्यांने या घटनांना चालना दिली. त्यानंतर पहलू खान, आखलाक, अफराजूल आणि जुनैद या निरपराधांच्या जाहीर हत्या झाल्या. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा चोरीचा आळ घेत तबरेज अन्सारी या निष्पाप युवकांची हत्या केली, असा आरोप या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केला.
मुस्लीम आणि दलितविरोधी घटनांमध्ये रोहित वेमुला,नजीब आणि पायल तडवी यांचा बळी गेला आहे. कालपर्यंत रस्त्यांवर सुरू झालेली हिंसा आता महाविद्यालयांच्या कँपसपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला रोखण्यासाठी सोलापुरात मुस्लीम समुदायाच्यावतीने हे आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.