सोलापूर -सोलापुरातील बार्शी येथे गुंतवणूकीतून मोठा परतावा मिळेल, अशी भूल थापा मारत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करुन गुंतवणुकदारांना चुना लावणाऱ्या विशाल फटे याने स्वतःहुन पोलिसांना शरणागती पत्कारली आहे. सोमवारी (आज) सायंकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यालयात विशाल फटे हजर झाला.
माहिती देतांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते गेल्या आठवडाभरापासून सोलापुरात चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी विशाल अंबादास फटे विरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. मुख्य संशयीत आरोपी विशाल याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या कामात सहकार्य करणाऱ्या दिपक बाबासाहेब अंबारे (रा. शेळके प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी) यानेच याबाबत तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
फसवणुकीचा आकडा कोट्यावधींचा
फसवणूकीचा प्रारंभिक आकडा 18 कोटींचा असला तरी तो अब्जावधी रुपयामध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यांना आपला आर्थिक स्त्रोत सांगण्यामध्ये अडचणी आहेत, अशा अनेक व्यक्तींनी अजूनही पोलिसांकडे रितसर तक्रार दिलेली नाही. सद्यस्थितीत हा आकडा 18 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
गुंतवणूकदारांनी 14 जानेवारीला विशालच्या घरी जाऊन केली होती तोडफोड
फसवणुकीमुळे क्षुब्ध झालेल्या गुंतवणुकीदारांनी विशालच्या बार्शी येथील अलिपूर रस्त्यावरील घरी व उपळाई रस्त्यावरील कार्यालयात जाऊन तेथील वस्तूंची तोडफोड केली होती. शुक्रवारी 14 जानेवारीला दिवसभरात आणखी 36 लोकांनी दिलेल्या माहितीवरून फसवणुकीचा आकडा 18 कोटी 36 लाखावर गेला आहे. विशाल देशाबाहेर पळून जावू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच त्याचे आई-वडिल-भाऊ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. अखेर त्याने स्वतःहुन पोलीस अधीक्षक कार्यालयात शरणागती पत्करली.
विशालने शेअर्स मार्केटचे दाखविले आमिश
विशालचे वडिल अंबादास फटे हे बार्शी येथील भगवंत प्रसाद सुलाखे वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक आहेत. विशालने प्रारंभी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रस्त्यावरील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये नेट कॅफे सुरु केले होते. प्रारंभी विशाल शेअर बाजारात ट्रेडिंग करत होता. त्याचे क्लासेस घेत होता. तेथे प्रचंड नफा होत असल्याचे तो सर्वांना सांगत असे. त्यामुळे तक्रारासह अनेकजण त्याच्याकडे आकर्षिले गेले.
असा सुरु केला त्याने धंदा
विशालने शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अलका शेअर्स सर्व्हिसेस, विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड, जे. एम. फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कंपन्या काढल्या होत्या. त्याच्या घरातील सदस्य या कंपन्यामध्ये भागीदार होते. या कंपन्याच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये काढलेल्या खात्यामध्ये आणि रोख, चेकव्दारे तो लोकांकडून रकमा स्वीकारत होता. मोठा परतावा देण्याचे आमिष तो दाखवित होता. दिर्घकाळ त्याने आर्थिक देवाण घेवाण फिर्यादी दिपकच्या खात्यातून केली. त्याचे व्यवहार जवळून बघत असल्यामुळे दिपकचा त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याने आपले नातेवाईक, मित्र अशा अनेक लोकांना विशाल कडे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. विशालने आकर्षक लाभाच्या वेगवेगळ्या योजना काढल्या आणि त्यात लोकांना भरमसाठ परतावाही दिला. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास वाढतच गेला.
अन् त्याचा मोबाईल बंद झाला
शुक्रवारी 7 जानेवारी रोजी पुणे येथील विशालच्या नातेवाईकाला हार्ट ऍटक आल्यामुळे त्यांना भेटण्यास जात आहे, असे सांगून विशालने बार्शी सोडली. त्यानंतर 9 तारखेला त्याचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर त्याचा कसलाच संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. बार्शी शहरातील नागरिकांची अधिक व्याज देतो, असे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील विशाल अंबादास फटे यांची पाच बँकातील खाती पोलीसांनी बँकांना पत्र देवून गोठवली आहेत. दरम्यान यात फसवणूक झालेले अनेकजण पुढे येत असून बार्शी पोलीस ठाण्याकडे तक्रारदारांची गर्दी झाली होती.
अशी पत्करली शरणागती
विशाल फटे याने 17 जानेवारी रोजी सकाळी युट्यूब या सोशल मीडिया साईटवरून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि कुठेही पळून जात नसल्याची माहिती प्रसिद्ध केली. मी स्वतःहुन पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांसमोर त्याने स्वतःला सरेंडर केले. त्याबाबत पोलीस अधीक्षकांनी सध्या ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
हेही वाचा -Bully Bai App Case : तिनही आरोपीच्या जामीन अर्जावर मंगळवारी होणार पुन्हा सुनावणी