सोलापूर-महावितरण कार्यालयात कार्यरत असणाऱ्या वरीष्ठ तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विडी घरकुल परिसरातील सागर चौक येथे ही घटना घडली. लाईन चालू करण्यासाठी सचिन प्रकाश इंगळे(वय 40 वर्ष रा रविवार पेठ,सोलापूर) हे विद्युक वाहिनीच्या खांबावर चढले होते. त्यावेळी ते तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेस महावितरणाला जबाबदार धरत मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घालायला सुरुवात केली.
अपंग असताना खांबावर चढण्याचा आदेश कुणी दिला-
सचिन इंगळे यांना गेल्या वर्षी अपघाती अपंगत्व आले होते. म्हणून त्यांची नियुक्त बाळे येथील सबडिव्हिजन मध्ये करण्यात आली होती. पाठीत रॉड असल्याने त्यांना हलकेच काम लावले जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. पण गुरुवारी सायंकाळी विडी घरकुल येथील सागर चौकातील विद्युत वाहिनीच्या खांबावर सचिन इंगळे यांना कोणी चढण्याचा सल्ला किंवा आदेश दिला? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे याची अधिक चौकशी केली जाणार असल्याची माहिती महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली