सोलापूर - सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सोलापुरात कोणत्याही सार्वजनिक उत्सवाला परवानगी देण्यात आली नव्हती. यंदाच्या वर्षी कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने तसेच निर्बंध उठवल्याने सोलापुरातील सार्वजनिक उत्सवास सुरुवात झाली आहे. यंदा 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. 17 एप्रिल रोजी जयंती मिरवणूक काढली जाणार आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने सुप्रीम कोर्टाची नियमावली सांगत डीजे डॉल्बीला परवानगी नाकारली आहे.
मोर्चाचा प्रतिनिधींनी घेतलेला आढावा जयंती उत्सव साजरा करणारे बांधव आणि आंबेडकरी नेत्यांनी पोलिसांकडे दोन बेस दोन टॉप अशी डॉल्बी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत प्रशासनाशी लढणार असल्याची भूमिका घेत, शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
दोन बेस दोन टॉपची मागणी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला दोन बेस दोन टॉप अशी मागणी आंबेडकर जयंती उत्सवातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे. पण पोलीस प्रशासनाने पारंपरिक वाद्यांना परवानगी दिली जाईल. आणि 75 डेसीबील पेक्षा कर्णकर्कश आवाज असणारे डीजे डॉल्बीला परवानगी नाही, असे पोलीस प्रशासनाने ठणकावून सांगितले. पण केस तर केस 16 बेस अशी घोषणा देत डीजे डॉल्बीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला.
अन्यथा जयंती उत्सव काळ वाढवू -दोन बेस दोन टॉप याला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही तर जयंती उत्सव काळ वाढवू आणि प्रशासनास वेठीस धरू, अशी भूमिका आंदोलकांनी ई टीव्ही भारत शी बोलताना व्यक्त केली. यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा साजरा केला जाणार आहे. अन्यथा 30 एप्रिल पर्यंत जयंती उत्सव घेऊन जाऊ आणि डॉल्बीने मिरवणूक काढू, अशी ठाम भूमिका आनंद चंदनशिवे, रॉकी बंगाळे, बाळासाहेब वाघमारे आदींनी व्यक्त केली.