सोलापूर - मोदी सरकार सत्तेवर आल्यापासुन सतत देशाची संपत्ती विकत आहेत. सरकारी कंपन्या विकत आहेत. नुकत्याच झालेल्या बजेट मध्येही एलआयसी व इतर कंपन्यांचे खासगीकरणाच्या नावाखाली विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. याच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन जवळ निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात आला. हातगाडीवर सरकारी कंपन्यांचे सेल लावून निदर्शने करण्यात आली.
भारत सरकारच्या कंपन्या विकण्याचा डाव-
यावेळी बोलताना शहर युवक काँग्रेसच्या वतीने अंबादास बाबा करगुळे म्हणाले की, काँग्रेसने काय केले, असे प्रश्न विचारत व खोटेनाटे आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले आहे. सत्तेवर येताच जनताविरोधी धोरणे व निर्णय राबवित आहेत. त्यामुळे देश कंगाल होत असुन आर्थिक संकटात आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात उभ्या केलेल्या लाखो कोटीच्या सरकारी कंपन्या देशाची संपत्ती असुन ते खासगीकरणाच्या नावाखाली विकत आहेत. आजतागायत भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआय व इतर बँका, रेल्वे, शिपिंग कॉर्पोरेशन, कोल इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जेएनपीटी बंदर या व इतर कंपन्या मोदी सरकारने टप्प्याटप्प्याने विकले आहेत. तसेच यंदाच्या बजेटमध्येही एलआयसी, बँका, वेअर हाउस, हवाई अड्डे, विजवाहिन्या, रस्ते, इंडियन ऑयल पाइपलाइन, सरकारी खुल्या जमीनी खासगीकरणाच्या नावाखाली विकण्याच्या निर्णय घेण्यात आला. यांना शक्य असेल तर उद्या देशही विकतील. यातील बहुतेक सर्व कंपन्या आपले उद्योगपती असलेल्या मित्रांच्या घशात घालण्याचे काम मोदी सरकार करत आहेत.