सोलापूर - हिंगणघाट घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिला तसंच मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपींबाबतीत कुठलीही दयामाया न दाखवता आणि तांत्रिक बाबी पुढे न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करा किंवा हैदराबाद एन्काऊंटरसारखं काहीतरी करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी आज(मंगळवार) सोलापुरात दिली.
हेही वाचा -हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'
युवक काँग्रेसच्यावतीने आज सोलापुरात वाढत्या बेरोजगारीविरोधात निदर्शनं करण्यात आली. त्याचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले होते. त्यावेळी त्यांना हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच हैदराबाद बलात्कार प्रकारणानंतर करण्यात आलेल्या एन्काऊंटरचे त्यांनी समर्थन केले.
देशात सध्या महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारचे प्रमाण वाढत चालले आहे. घटना घडल्यानंतर लोक रस्त्यावर येतात. पण, समाजप्रबोधनातून पुरुषी मानसिकता बदलायला हवी. तसेच अशा घटनांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. याच भावनेतून आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.