सोलापूर-राज्याला स्थिर सरकार मिळाले, तर महागाई कमी होईल, अशी आशा वाटत आहे. कारण, केंद्राकडून महागाई कमी होताना दिसत नाही. आज सिलिंडरचा दर ११०० रुपये झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे जेवण बनवणेही कठीण झाले आहे. तरीही कोरोनानंतर आलेल्या निर्बंधमुक्त नागपंचमीच्या सणामुळे आज सर्व आनंदीत आहेत. सध्या सरकार बदलून ३५ दिवस झाले आहे. तरीही फक्त दोघांवरच सरकार चाललंय. 'काय झाडी, काय डोंगार', असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनता 'नॉट ओके' आहे, असे काँग्रेसच्या आमदार प्रणिती यांनी आमदार शहाजी पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे.
भाजपकडून खालच्या पातळीवर राजकारण सुरू -सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या नागपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात विविध ठिकाणी नागरिकांच्या, महिलांच्या भेटी घेतल्या. माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. प्रणिती शिंदे यांनी यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत यांच्या ईडीच्या चौकशीवरून भाजपला टार्गेट केले आहे. त्या म्हणाल्या की, भाजपचे खूप खालच्या पातळीवरून राजकारण सुरू आहे. जे प्रकरण २०१५ मध्ये बंद झाले आहे. ते आज पुन्हा बाहेर काढून सोनिया गांधींना त्रास दिला जात आहे. केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे. सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या आणि मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना 10-10 वेळा ईडीकडून चौकशीला बोलावले जात आहे. राहुल गांधी यांना बोलावून घेत 6-6 तास चौकशीला बसवले जात आहे.
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये -आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पार्लमेंटमध्ये भाजपच्या खासदार स्मृती इराणी या हमरीतुमरीची भाषा करतात. भाजपची खालच्या पातळीला जाऊन अटॅक करण्याची जी संस्कृती आहे, ती दिसून येत आहे. मात्र, स्मृती इराणींचे सिलिसोलचे प्रकरण काय आहे, ते तुम्हाला माहिती आहे. इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट केली जाते. त्यामुळे मला असे वाटते की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकू नये.