सोलापूर- शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथक पाठविण्याचा विचार करू. सोलापुरातील कोरोना विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज (दि. 15 जून) सांगितले.
सोलापूरला विशेष वैद्यकीय पथक पाठविण्याचा विचार करू - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पाठविण्याचा विचार करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले.
खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांकडून शासकीय दरानुसार पैसे आकारावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूरसाठी स्वतंत्र पथकांची मागणी केली होती.
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अमित देशमुख यांनी या सूचना दिल्या आहेत. या बैठकीस आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सोलापुरातील कोरोना प्रसार शहराच्या ठराविक भागांत आहे. त्या भागात आणि मुंबईच्या धारावी परिसरात काही अंशी साम्य आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना सोलापुरात राबवाव्यात अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. प्रसार वाढणार नाही यासाठी फिल्डवर आणि रुग्णालयात अशा दोन आघाड्यांवर कोरोना विरुद्धची लढाई लढायची आहे. विशेषकरून वयस्कर व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब आणि ह्रदयरोग, अशा आजार असणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवायला हवे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या उपचारासाठी स्वतंत्र उपाययोजना करायला हव्यात, असे सांगितले.
हेही वाचा -अश्विनी रुग्णालयाच्या १३३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; कोरोना काळात राहिले होते गैरहजर..