सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाकडून आज (४ जुलै) सोलापुरात आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलीस परवानगी नसतानाही आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाला हिंसक वळण लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पोलिसांनी शांततेने मोर्चा काढण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असा मोर्चाचा मार्ग होता.
परंतु कोरोना महामारीचे कारण समोर करून पोलिसांनी आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली होती. यामुळे आक्रोश मोर्चावर पोलीस प्रशासनाची करडी नजर होती. मोर्चाची सांगता झाल्यावर अचानकपणे तीन ते चार तरुण सात रस्ता येथे एका कर्नाटक बसवर दगडफेक करून गेले. दगडफेक करणारे तरुण मोर्चाला आलेले होते का, याचा तपास सुरू आहे. कर्नाटक येथील तेरादल येथून सोलापूरकडे आलेल्या बसच्या काचेचे नुकसान झाले आहे.
बंदी झुगारुन आक्रोश मोर्चा -
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ प्रसारित करून जाहीर केले होते की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाला परवानगी नाकारली आहे. कोणीही हुल्लडबाजी करत मोर्चाला येऊ नये, अशी सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिली होती. ही बंदी झुगारून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संभाजी चौक येथून सुरू झालेल्या मोर्चाला पार्क चौक येथेच पोलिसांनी अडविले आणि मोजक्या मराठा बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोडले. जवळपास 1200 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, 110 पोलीस अधिकारी, एसआरपीच्या तीन तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.