सोलापूर- लखीमपूर(उत्तर प्रदेश) येथील शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी महाविकासआघाडी कडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सोलापुरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेत शहरातील मुख्य बाजारपेठेत रुट मार्च काढून नागरिक आणि व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी शिवसेनेकडूनही नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवहन करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखत होत आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतर मात्र आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करून लखीमपूर घटनेप्रकरणी भाजपाचा निषेध व्यक्त केला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी बीजेपी मंत्र्यांची उदघाटन सोहळ्यास उपस्थिती- आमदार प्रणिती शिंदे
लखीमपूर(ऊत्तर प्रदेश)येथील आंदोलक शेतकऱ्यांवर चार चाकी वाहन घालून भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने त्यांना चिरडले. यात 8 जणांचा मृत्यू झाला. ही क्रुर घटना घडल्यानंतरही बीजेपीचे केंद्रीय राज्य मंत्री या घटनेबद्दल कोणतीही सहानभुती न दाखवता एका उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले होते, ही अतिशय लाजिरवाणी घटना असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मानसिकता बिघडली आहे. आम्ही सत्तेत आहोत, आम्ही काहीही करू अशी विकृत मनोवृत्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी भाजपाच्या नेत्यांवर केली आहे.