पंढरपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासात होणार आहे. या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपाकडून बऱ्याच नावांची चर्चा जोरदार चालू आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला केंद्रामध्ये नेतृत्व देण्याची तयारी भाजपाकडून होण्याची शक्यता आहे.
यामुळे नाईक-निंबाळकरांना संधीची शक्यता
पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्यातील चार चेहर्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये कोकणातून नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातून खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा विचार केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यातून माढा मतदार संघातून पहिल्यांदाच कमळ फुलवण्याचे काम रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाला बळकटी देण्यासाठी नाईक-निंबाळकर यांना संधी दिली जाऊ शकते. माढा मतदारसंघांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा सांगोला माळशिरस करमाळा या तालुक्यांचा समावेश होतो तर सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व फलटण या तालुक्यांचा समावेश केला आहे.