महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2021 : आजोबा गणपतीची प्रेरणा घेत लोकमान्य टिळकांनी सुरु केला सार्वजनिक गणेशोत्सव - लोकमान्य टिळकांनी सुरु केला सार्वजनिक गणेशोत्सव

सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला आज 136 वर्ष पूर्ण झाले. लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यातून गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध धार्मिक कार्यक्रमातुन भारतीय एकता दाखवणे आणि इंग्रजाचा बिमोड करणे, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून स्वातंत्र्य पूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

आजोबा गणपती
आजोबा गणपती

By

Published : Sep 10, 2021, 5:00 PM IST

Updated : Sep 10, 2021, 5:16 PM IST

सोलापूर -लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन स्वातंत्रपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्री श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती. सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला आज 136 वर्ष पूर्ण झाले. लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यातून गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध धार्मिक कार्यक्रमातुन भारतीय एकता दाखवणे आणि इंग्रजाचा बिमोड करणे, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून स्वातंत्र्य पूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावर एका कार्यक्रमात टिळकांनी हा गणेशोत्सव एक दिवस ऑलम्पिकच्या बरोबरीने जगभर साजरा होईल, असे बोलून दाखवले होते. गेल्या सव्वाशे वर्षांपासून गणेशपूजेला सार्वजनिक गणेशोत्सव पूजेचे रूप आले आहे.

माहिती देतांना आजोबा गणपतीचे प्रसिद्धी प्रमुख
राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणारा आजोबा गणपती

स्वातंत्र्य पूर्व काळात सोलापुरातील आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी संघटीत शक्ती देत होते. लोकमान्य टिळक हे 1885 साली सोलापूरला आले होते. लोकमान्य टिळक आणि सोलापुरातील प्रसिध्द उद्योगपती आप्पासाहेब वारद यांच्यात घनिष्ट मैत्री होती. टिळक हे सोलापूर येथे आल्यावर वारद यांच्या घरी वास्तव्य करत होते. जुन्या फौजदार चावडी जवळील श्रद्धानंद समाजाचे पसारे यांनी आपल्या घरी टिळकांना पान सुपारीसाठी आमंत्रित केले होते. अप्पा वारद आणि टिळक हे शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती व गणेशोत्सव समारंभात पान सुपारीला गेले आणि त्या कार्यक्रमात एकत्रित येणारे नागरिकाना पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगितले जाते. त्यानंतर 1894 सालापासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.


ऐतिहासिक परंपरेचा मानाचा आजोबा गणपती

श्री श्रद्धानंद समाजाच्या सार्वजनिक आजोबा गणपतीला मोठा इतिहास आहे. सोलापुरातील आजोबा गणपतीची स्थापना होऊन 136 वर्ष पूर्ण झाली आहेत. जुन्या पिढीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी व विविध घरातील व्यक्तींनी एकत्रित येऊन 1885 मध्ये सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. आजोबा गणपतीची पहिली मूर्ती निलप्पा उजळमबे ,आडव्याप्पा माळगे व आवटे या मूर्तिकाराकडून तयार करून घेण्यात आली होती.

इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पनेचा निर्माता

सध्या सगळीकडे पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र 136 वर्षांपूर्वी सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. 1885 साली रद्दी कागद, कामट्या, खळ, डिंक, कापड आदी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून श्रींची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली होती.

आकर्षक मंदिराची उभारणी

1994 मध्ये माणिक चौक येथे आजोबा गणपतीचे नवीन आकर्षक मंदिर उभारले गेले. त्याचबरोबर गणरायास सोन्याचे दागिने, शस्त्र बनविण्यात आले. मंदिराच्या निर्मितीपासून आजतागायत रोज सकाळ आणि संध्याकाळी पूजा व महाआरती होते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला शहर व जिल्ह्यातील 25 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. सध्या आजोबा गणपतीची जबाबदारी चिदानंद वनारोटे, अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, काका मेंडके, सिद्धरुढ निंबाळे यांच्याकडे आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर बंदच आहे. अनेक भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन जात आहेत.

हेही वाचा -अरे व्वा! बंगाली मूर्तिकाराने महाराष्ट्रात बनवला साबुदाण्यापासून गणपती, मध्य प्रदेशात होणार स्थापना

Last Updated : Sep 10, 2021, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details