महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर शहरात लॉकडाऊनच्या नियमांत अखेर शिथिलता

सोलापुरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकांधारकाना आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानांना देखील सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सूट देण्यात आली आहे.

lockdown-relaxation-in-solapur-city
लॉकडाऊन

By

Published : Jun 4, 2021, 9:49 AM IST

सोलापूर- शहरात लॉकडाऊनच्या नियमांत अखेर शिथिलता देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा सुधारित आदेश मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी पारित केला. यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आणि कामगारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकांधारकाना आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानांना देखील सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सूट देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य गेटजवळ आंदोलन झाल्याने प्रशासनाने अखेर सोलापूरकरांची कडक लॉकडाऊनच्या नियमावलीतून सुटका केली आहे. रात्री उशीरा महानगरपालिका उपायुक्त जमीर लेंग्रेकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

आता बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढणार-

मार्च महिन्याच्या अखेरीस पासून सोलापुरात कडक लॉकडाऊन लावले होते. तेव्हापासून सोलापूर शहरातील सर्व बाजारपेठा, सराफा कट्ट्यात शुकशुकाट होता. आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येत आहे. राज्य शासनाने देखील लॉकडाऊन संदर्भात राज्यात 1 जून नंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करणार असे जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी स्थानिक प्रशासनाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 जून पर्यंत परिस्थिती जैसे थे किंवा लॉकडाऊनच्या नियमावलीत कोणतेही बदल करणार नसल्याचे जाहीर केल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यामुळे 1 जून पासूनच व्यापारी आणि कामगार हवालदिल झाले होते. किती दिवस व्यापार बंद ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी आंदोलनाची भूमिका घेत व्यापारी वर्गाने बुधवारी सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर आंदोलन केले होते. गुरुवारी विडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांनी देखील सोलापूर पालिकेला घेराव घालून आंदोलन केले होते.

सोलापूर शहरात लॉकडाऊनच्या नियमांत अखेर शिथिलता..


अखेर राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशीरा सोलापूर पालिकेला स्वतंत्र युनिट म्हणून जाहीर केले आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला. या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल केला आणि सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सूट दिली. या निर्णयामुळे सोलापूर शहराच्या बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ दिसून येणार आहे. आता पुन्हा हळूहळू बाजारपेठा फुलणार आहेत.

आता काय सुरू काय राहणार बंद-

-सोलापूर शहरात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने खुली राहणार.

-अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने देखील सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार.

- हॉटेल किंवा रेस्टॉरंट पार्सल सेवेसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार.मात्र दुपारी 2 नंतर रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सुविधा देऊ शकणार.

- शहरातील मद्य दुकाने सर्व दिवशी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार.

- शहरातील सर्व प्रकारचे रास्त भाव धान्य दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार.

- विडी उद्योग आणि यंत्रमाग उद्योग सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार. मात्र विडी कामगारांना किंवा यंत्रमाग कामगारांना रॅपिड टेस्ट किंवा आरटीपीसीआर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत जवळ बाळगणे आवश्यक राहणार आहे.

- कृषी संबंधित शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार.

- दुपारी 3 नंतर कोणत्याही नागरिकास शहरात विनाकारण फिरता येणार नाही. तीन नंतर शहरात संचारबंदी असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय सेवे व्यतिरिक्त इतर नागरिकांना फिरता येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details