सोलापूर - सोलापुरात ( Solapur ) आता ऑटो रिक्षाने प्रवास करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ( Deputy Regional Transport Office ) रिक्षा भाडेवाढचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र, सद्यस्थितीत सोलापुरात एकही रिक्षा मीटरप्रमाणे धावत नाही. या परिपत्रकानुसार भाडेवाढ ( fare hike ) आकारणी केले, तर ग्राहक येणारच नसल्याची खंत शहरातील रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहरातील वाढती बेरोजगारी, कमी पगार हे सुद्धा मुख्य कारणे आहेत. शहरातील नागरिकच मीटरप्रमाणे भाडे देत नसल्याने रिक्षा चालकांनी सीटनुसार वडाप पद्धतीने भाडे आकारत असल्याची माहिती रिक्षा चालक आणि प्रवाशांनी दिली आहे.
जेमतेम सिटी बसेस सुरू -सोलापूर महानगरपालिकेने सिटीबसची स्थापना करून अनेक वर्षे झाली. आजतागायत या बस खात्याची अवस्था बिघडलेली आहे. बोटावर मोजण्या इतक्याच बसेस सोलापूर शहरातील रस्त्यावर धावताना दिसतात. सिटी बसेसची मुबलक सेवा उपलब्ध नसल्याने रिक्षावाले, व खाजगी वडाप आले. प्रवाशी वाहतूक सोलापुरात करत आहेत.
10 रुपये ते 40 रुपये प्रति सीट नुसार भाडे -सोलापूर शहरात सोलापूर महानगरपालिकेच्या मुबलक बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षा मधून प्रवास अधिक होतो. यामध्ये टेक्सटाईल कामगार वर्ग, बिडी कामगार, हॉटेल मधील कामगार यांची संख्या अधिक आहे. एसटी स्टँड ते विमानतळ, एसटी स्टँड ते सैफुल, कोंतम चौक ते नवीन घरकुल, जोडबसवणा चौक ते नवीन व जुना घरकुल या मार्गावर अनेक रिक्षा सीटनुसार प्रवाशी वाहतूक करतात. 10 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत प्रति सीट भाडे आकारले जात आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि LPG यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे.