सोलापूर - महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने (Janhit Shetkari Sanghatana Protest) महावितरण कार्यालयात वीज बिल माफीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी फरफटत नेले आहे. शेतात काम करण्याचे औजार म्हणजे रुमणं घेऊन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आले होते. पण निवेदन देण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलीस परवानगी नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः फरफटत नेले. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आंदोलन झाले, पण पोलिसांनी शेतकऱ्यांचा एक शब्दही न ऐकता त्यांना ताब्यात घेतले आहे.
सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात आंदोलन-
लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना उसाची बिल देखील साखर कारखानदार वेळेवर देत नाहीत. शेतकरी भयानक संकटात आहेत. अशा संकटावेळी महावितरण मात्र सक्तीची वीज बिल वसुली करत आहेत. लॉकडाऊन, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल असताना सक्तीची वीज बिल वसुली थांबवा आणि संपूर्ण वीज बिल माफ करा, अशी मागणी करत जनहित शेतकरी संघटनेने हातात रुमणं घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.