सोलापूर - मराठा समाजाच्या विविध न्यायिक मागण्यांसाठी सोलापुरातील जुना पुणे नाका येथील संभाजी चौकात आज (सोमवार) जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मराठा समन्वय समिती आणि छावा संघटनेच्या वतीने सरकारला जागे करण्यासाठी हे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या विविध न्यायिक मागण्यासाठी मराठा समन्वय समिती आणि छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. सोलापूर येथील हे आंदोलन छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रतापसिंह शिवाजीराव कांचन-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 17 आगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा पुणे नाका सोलापुर येथे पार पडले.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोलापुरात 'जागरण गोंधळ आंदोलन' हेही वाचा -'फक्त महाराष्ट्रातील नव्हे, तर संजय राऊतांनी संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी'
या जागरण गोंधळ आंदोलनात प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या...
- महाविकास आघाडी मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली
- मराठा समाज आरक्षण व मागण्यासाठी 2 दिवसीय विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे
- मराठा आरक्षणाची न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी न घेता हे कामकाज पूर्ण पणे कोर्ट सुरू झाल्यावर सुनावणी घ्यावी
- मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी काम केले आहे, त्यांना सर्व न्यायालयात होत असलेल्या सुनावणीमध्ये सहभागी करा
- मराठा आरक्षण व मराठा समाजाचे इतर महत्त्वाचे विषय विजय वडेट्टीवार यांच्याकडे ठेऊ नये, ते दुसऱ्या मंत्र्यांकडे द्या, अशी मागणी केली
- तसेच मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत ज्यांना चांगली जाण आहे, अशा महत्वाच्या मंडळी सोबत बैठक घेऊन आरक्षण सद्यपरिस्थिती बाबत माहिती द्यावी सुचना ऐकून घ्याव्यात
- अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 5 हजार कोटी निधी कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून द्या
- मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घ्या
- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधकामावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
- मराठा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजना त्वरित सुरू करा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10 टक्के आरक्षण फक्त मराठा समाजालाच लाभ घेता येणार नाही, हा 28 जुलै 2020 चा निर्णय रद्द करावा
अशा विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन सोलापूरात झाले. यावेळी नागेश पवार, कुंदन ताकमोगे, गणेश साठे, स्वप्नील तोडकरी सह दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.