सोलापूर - सोलापुरात पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या फ्रुट बियरमध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न व औषध प्रशासन विभागाने जेलरोड पोलीस ठाणे आणि वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फ्रुट बियरमध्ये ड्रेनेजच्या पाण्याचा वापर हे शरीरास अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी फ्रुट बियरचे प्राशन करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रदीप राऊत यांनी केले आहे. तसेच, सोलापुरातील या फ्रुट बियर कारखान्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माहिती देताना अन्न व औषध प्रशासन अधिकारी हेही वाचा -'व्होकल फॉर लोकल'ला सोलापुरातून उदंड प्रतिसाद; स्थानिक पणत्या खरेदीसाठी प्राधान्य
ऑगस्ट 2021 मध्ये फ्रुट बियर कारखान्यावर कारवाई झाली होती
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सोलापुरातील पूर्व विभागात फ्रुट बियर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली होती. दत्त नगरातील गिरी झोपडपट्टी येथील ओम साई ड्रिंक्स येथे धाड टाकण्यात आली होती. या फर्मचे मालक बलराम बंदाराम यांच्या विरोधात व नीलम नगरातील गंडे चौकातील विक्रेता सुरेश भीमराव विटकर यांच्या विरोधात कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसेच, शहराच्या बाहेर असलेल्या गोदूताई विडी घरकुल परिसरात साई ड्रिंक्सवर कारवाई करत अमरसिद्ध पिंडीपोल शिवराज चिंचोळ याच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. आणि सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या ड्रिंक्सचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी भेसळ केल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, जेलरोड पोलीस ठाणे आणि वळसंग पोलीस ठाणे येथे फिर्याद देण्यात आली. भारतीय दंड विधान 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फ्रुट बियरमध्ये क्वालिफॉर्मचा घटक (शौचामधील घटक) -
हा घटक मानवी विष्ठा किंवा आतड्यात असतो. फ्रुट बियरमध्ये या पदार्थाचा अंश येणे खूप घातक आहे. फ्रुट बियर तयार करणाऱ्यांनी चक्क ड्रेनेजचे पाणी वापरले असल्याचा अहवाल प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. सोलापुरातील अशा फ्रुट बियर कंपन्यांविरोधात कडक कारवाई करून सील करण्याची कारवाई, तसेच गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा -कसा आहे अकलूज येथील सर्वधर्मसमभावचा संदेश देणारा 'आकाश कंदील'? वाचा...