सोलापूर -दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीचा असतो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. त्यानुसारमहाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ( Sri Vitthal-Rukmini Temple ) गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे ३ वाजून १० मिनिटाच्या सुमारास विठ्ठल- रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला.
आचार संहिंतेचे पालन करत महापूजा -पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवर पूजेची परवानगी देण्यात आली होती. विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते.
वारकरी दाम्पत्याचा सन्मान - मुख्यमंत्र्यांसोबतच दर्शन रांगेतील पहिल्या वारकऱ्यासही विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळत असतो. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी याच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनासह सर्व अडचणी दूर कर - आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर, असे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेच्या वेळी वारकरी रांगेतील वारकरी बीडचे नवले दाम्पत्य होते. विठ्ठल पूजेचा मान मिळालेल्या मुरली भगवान नवले व जिजाबाई मुरली नवले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवलेंची वारीची परंपरा -शासकीय पूजेचा मान मिळालेले नवले दाम्पत्य हे अनेक वर्षांपासून पायी वारी करीत आहेत.गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरू आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत. आज त्यांच्या भाग्यात विठ्ठलाच्या पूजेचा मान होता. भगवान नवले आमि जिजाबाई नवले यांनीही अत्यंत मनोभावे विठ्ठलाची पूजा केली.