सोलापूर- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता सर्व महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. या दृष्टीने सोलापुरातील राजकारण्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघातील मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यानच माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाजप एमआयएम आणि मनसे या तीन पक्षांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हे तिन्ही तिन्ही पक्ष जातीय समीकरणे खेळून सत्तेत येत असल्याचा गंभीर आरोप आडम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावर एमआयएमचे नेते फारुक शाब्दी यांनी देखील प्रत्युत्तरादाखल आडम यांच्यावर राजकीय टीकेचा पलटवार केला आहे.
भाजप, एमआयएम आणि मनसे जातीयवादी पक्ष आहेत- नरसय्या आडम-
गुरुवारी माकपच्या वतीने भारत बंदबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि मनसे विरोधात एकत्र व्हा, भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे असेल तर एकत्रित लढा द्यावा लागेल, असे आवाहन जनतेला आणि इतर पक्षांना केले. कारण हे तिन्ही पक्ष(मनसे, भाजपा, एमआयएम) जातीय राजकारण किंवा जातीय समीकरणे मांडून मते मागतात. भारतीय जनता पक्षाने अशीच जातीय समीकरणे मांडून सत्ता प्राप्त केली आहे आणि विकास मात्र काडीएव्हढा केला नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सोलापुरातील महानगरपालिका क्षेत्रातील विकास भाजपमुळे खुंटला आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे, असे खोचक टोले मारत आडम मास्तर यांनी एमआयएम आणि भाजपवर निशाणा साधला.