सोलापूर- वाढत्या महागाई विरोधात गुरुवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आठ वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत महागाई वाढली आहे. देशाच्या विकासाचा आलेख वाढण्याऐवजी अधोगतीकडे झुकत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जटील आणि किचकट होत चालले आहेत. जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडणारी महागाई अनियंत्रित वाढत चालली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, अशी खरमरीत टीका करत ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
कोविड काळात महागाई वाढली
मार्च, 2020 पासून देशभरात कोरोना महामारीने एकच थैमान घातले आहे. या काळात संघटीत आणि असंघटित उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. यामुळे लाखो कामगारांचे काम गेले आहे. कोट्यवधी कामगार किमान वेतनापेक्षा कमी मजुरीवर काम करत आहेत. पण, याच काळात मूठभर अब्जाधीशाच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्र सरकार देशी विदेशी भांडवलदाराना मदत करत कामगार कायद्यात आमूलाग्र बदल करत आहे, असा आरोप देखील या निदर्शनावेळी नरसय्या आडम यांनी केला.
काळे कायदे रद्द करा
गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी हे तीन काळ्या कायद्याचा विरोध करत आहेत. तसेच कामगारांच्या बाबतीत देखील कायद्यात बदल केले आहे. शेतकरी आणि कामगारांच्या विषयातील काळे कायदे रद्द करा, अशी मागणी माकपच्या महिला नेत्या नसीमा शेख यांनी केली आहे. शेतकऱ्यांना आजही दुधाच्या किमतीत हमीभाव मिळाला नाही. कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी मजुरी मिळत आहे. अशा अनेक बाबी समोर करून आंदोलकांनी सरकारकडे मागण्या केल्या.
सोशल डिस्टन्सचा फज्जा
सोलापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. पण, याचा धोका आजही आहे. स्थानिक प्रशासन आजही मास्क आणि सोशल डिस्टन्सच्या सूचना देत आहे. पण, गुरुवारी झालेल्या आंदोलनात सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. आंदोलक दाटीवाटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत होते. पोलिसांनीही आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर एकाच वाहनात बसवून घेऊन गेले.
पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले
वाढत्या महागाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालसमोर मोठे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, वीरेंद्र पद्मा, शाम आडम, विजय हरसुरे, यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तर नसीमा शेख, युसूफ शेख, रंगप्पा मरेड्डी, हनिफ साथखेड, नरेश दुगाने आदी यंत्रमाग कामगार आणि विडी कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
हेही वाचा -समान निधी वाटपावरून सोलापूर महापालिकेत राडा