सोलापूर- थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. वीज बिल थकीत असलेल्यांचा विद्यूत पुरवठा वैयक्तीक खंडीत न करता थेट डीपीमधून खंडीत केला जात आहे. त्यामुळे वीज बिल भरलेल्या इतर शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. तसेच कोरोना महामारीने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह सोमवारी (7 मार्च) वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास दाखल झाले. सर्व शेतकरी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या कार्यालयात दाखल झाले. दिलीप माने यांनी कोणताही वाद न घालता वीज सुरू करावी, अन्यथा आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. तब्बल पाच ते सहा तास अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या मांडल्याने ( Dilip Mane Agitation ) महावितरणच्या अधिकाऱ्यांची गोची झाली होती.
सोलापुरात विद्यूत पुरवठा तोडणी मोहीम जोरात -वीज बिल थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्याने हा निर्णय घेत असल्याची माहिती व्हिडिओ तयार करून कीटकनाशक प्राशन केले. हा व्हिडिओ वायरल होताच सोलापूर जिल्ह्यात महावितरण विरोधात संतापाची लाट उसळली आहे.