सोलापूर - शहरात पूकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सोलापूर महापालिकेचे उपायूक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्याठिकाणी हजर न राहिल्यास थेट गून्हे दाखल करण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार सोलापूर शहरात 16 जूलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जूलैच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद राहणार आहेत. या 10 दिवसाच्या काळात किराणा दूकान, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, बॅंका यासह सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊन पूकारण्यात आले आहे. 10 दिवसाचा लॉकडाऊन पूकारण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना मदत करण्यासाठी सोलापूर महापालिकेचे कर्मचारी देण्यात आले आहेत. महापालिकेचे 400 कर्मचारी हे पोलिसांना मदत करणार आहेत. प्रत्येक प्रभागासाठी अधिकाऱ्यांची देखील नियूक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी कामाची नियूक्ती दिली आहे त्या ठिकाणी हजर राहणे अपेक्षित आहे. जे कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहतील त्या कर्मचाऱ्यांच्या विरूद्ध पोलिसात गून्हा दाखल केला जाईल, असे सोलापूर महापालिकेचे आयूक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये 400 लॉकडाऊन असिस्टंट (वर्ग-3) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 26 लॉकडाऊन निरीक्षक (वर्ग-1), 26 लॉकडाऊन क्षेत्रीय अधिकारी (वर्ग-2), 26 लोकडाऊन पर्यवेक्षक (वर्ग-2) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे आदेश हे त्यांच्या व्हॉट्सअप, ई-मेल व मेसेजद्वारे पाठवण्यात आले आहेत. ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांना 16 जूलैला महानगरपालिकेमध्ये हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
जे कर्मचारी आदेशाचे पालन न करता अनुपस्थिती राहतील सदरच्या कर्मचाऱ्यावर आपत्कालिन व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कलम 188 ची कारवाई, शिस्तभंगाची कारवाई व त्यांच्यावर आवश्यकते नुसार गुन्हा दाखल करण्याचा व सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव देखील करण्याच्या सूचना दिली असल्याचे, महापालिका उपायूक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.