सोलापूर - खासगी सावकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री उशिरा जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये एकूण 13 संशयित खासगी सावकार आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केतन उपासे यांना एकूण 74 लाख 25 हजार रुपयांचे सावकारी कर्ज झाले होते. या सावकारी त्रासाला कंटाळून केतन उपासे यांनी टोकाचे पाऊल उचलत 25 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. या प्रकरणात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
केतन उपासे आत्महत्या प्रकरण: तेरा खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल; तपास गुन्हे शाखेकडे वर्ग - सोलापूर तेरा खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल
केतन उपासे आत्महत्या प्रकरणात किरण आरगे, जयंत शेळके, अनिल लक्ष्मण जाधव, सोहम गायकवाड, शिवशरण अग्रवाल, पूजा अग्रवाल, सुभाष राजमाने (रा. टेंभूर्णी), सोमा सावकार, बिराण्णा बहिरवडे, काका जाधव, सुरेश अण्णाप्पा कोकटनूर, अनिल अंमदाळे, अनिल होटकर, सुभाष जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आणखी गुन्हेगार वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
केतन विजयकुमार उपासे (वय 35 ,रा गोली अपार्टमेंट,70 फूट रोड, सोलापूर) यांनी 25 सप्टेंबरला सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. खासगी सावकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप नातेवाईकांनी सुरुवातीला केला होता. त्यावर पोलिसांनी सखोल तपास करत मृत केतन उपासे यांच्या नातेवाईकाकडून तक्रार दाखल करून घेतली आहे.
स्वीट मार्टचे व्यवसाय वाढीसाठी उपासे यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. काही महिने व्याजासह मुद्दल फेडणारे उपासे लॉकडाऊनमुळे अडचणीत आले होते. त्यानंतर त्यांना व्याजाची रक्कम भरणे अवघड झाले होते. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून केतन उपासे यांनी अशोक चौकातील रेणुका स्विट्स हॉटेल विक्रीस काढले. त्याचा व्यवहार अनिल होटकर व सुभाष जाधव या सावकारांसोबत ठरला. त्या दोघांनी उपासे यांना 10 लाख रुपये इसारा दिला होता. उर्वरित रक्कम तीन महिन्यानंतर देण्याचे ठरलेले असतानाही त्यांनी ती रक्कम दिली नाही. व्यवहार रद्द झाल्यानंतर सावकारांनीच उपासे यांच्याकडे 10 लाख मुद्दल व 6 लाख 50 हजार रुपये व्याज मागितले. त्यापैकी सव्वातीन लाखांचे व्याज दिलेही. मात्र, उर्वरित रकमेसाठी त्यांनी त्रास द्यायला सुरवात केली. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून उपासे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकरणी किरण आरगे, जयंत शेळके, अनिल लक्ष्मण जाधव, सोहम गायकवाड, शिवशरण अग्रवाल, पूजा अग्रवाल, सुभाष राजमाने (रा. टेंभूर्णी), सोमा सावकार, बिराण्णा बहिरवडे, काका जाधव, सुरेश अण्णाप्पा कोकटनूर, अनिल अंमदाळे, अनिल होटकर, सुभाष जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आणखी गुन्हेगार वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत तपास अधिकारी एपीआय पवार यांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती दिली.