महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विना मास्क फिरणाऱ्या तरुणावर कारवाई केल्यामुळे नातेवाईकांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई केल्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये पोलिसांनी एका तरुणाला मारहाण केली असल्याची तक्रार घेऊन तरुणाचे नातेवाईक व इतर नागरिकांनी रविवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिला.

विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई; तरुणाच्या नातेवाईकांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या
विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई; तरुणाच्या नातेवाईकांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

By

Published : Aug 24, 2020, 1:50 PM IST

सोलापूर - सलगर वस्ती पोलीस ठाण्याअंतर्गत विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई केल्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये पोलिसांनी एका तरुणाला मारहाण केली असल्याची तक्रार घेऊन तरुणाचे नातेवाईक व इतर नागरिकांनी रविवारी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिला. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई सुरू होती. 20 ऑगस्ट या दिवशी निखिल जगनाथ गायकवाड(वय 27 रा, सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणावर विना मास्क दुचाकी वाहन चालवत असल्याने पोलिसांनी कारवाई केली आणि त्याची दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करून घेतली. कागदपत्रे दाखवून व दंड भरून वाहन घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रविवारी निखिल गायकवाड याने वाहन घेण्यासाठी सलगर वस्ती पोलीस ठाणे गाठले. मात्र, कागदपत्रे दाखवताना पोलीस व निखिल गायकवाड यामध्ये बाचाबाचीस सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या वादात झाले. निखिल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

काही वेळाने निखिल याचे नातेवाईक व महिला सलगर वस्ती पोलीस ठाण्यासमोर येऊन निखिल यास सोडा, अशी मागणी करू लागले. पोलीस निरीक्षक संपत पवार यासोबत देखील वादावादी झाली. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

सलगर वस्ती येथील महिला व इतर नागरिक पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात संताप व्यक्त करत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. पोलीस आयुक्त रविवार असल्याने घरी होते. नागरिकांनी आपला मोर्चा पोलीस आयुक्त निवासस्थानी वळविला. परंतु, बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी नागरिकांची व महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस निरीक्षकावर कारवाई झाल्याशिवाय माघारी जाणार नाही, अशी भूमिका घेत पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या केला.

सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आयुक्त कार्यालयासमोर येऊन पोलीस ठाण्याला चला, असे सांगत होते. तुमची देखील तक्रार दाखल करून घेतो सांगत होते. मात्र, नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवले, असे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details