सोलापूर -आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची अवस्था काय झाली आहे हे सर्वश्रुत आहे. अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे काय होते, हे सर्वांना माहिती आहे. कोणाचे पायपूस कुणाच्या पायाखाली नाही. नेत्याचा फोटो लावला नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्ते गोंधळ करत आहेत. मुळात या तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. गोंधळात गोंधळ अशीच यांची गत झाली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज (मंगळवार) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हेरिटेज लॉन येथे भाजप पक्षाच्यावतीने बैठक आयोजित केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
- सामान्यांच्या ज्या समस्या त्याच पदवीधरांच्या समस्या-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संवाद करणे गरजेचे आहे. सामान्यांची ज्या अडचणी आहेत, त्याच अडचणी किंवा समस्या शिक्षक व पदवीधारकांच्या आहेत. यातील 70 टक्के हे शेतकरी आहेत. या सरकारने शिक्षकांच्या व विजेच्या संदर्भात अद्यापही निर्णय घेतला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी भरपूर काम करावे अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
- राष्ट्रवादीचा उमेदवार कोणाचा आहे त्यांनाच कळत नाही -
महाविकास आघाडी सरकारने पदवीधर मतदारसंघासाठी अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. हा उमेदवार राष्ट्रवादीचा आहे की शिवसेनेचा आहे? हे अद्यापही कुणालाही कळत नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, दुसरीकडे भाजपच्यावतीने चांगले उमेदवार देण्यात आले आहेत. हे दोन्ही उमेदवार नक्कीच जिंकणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.