सोलापूर- बुधवारी (दि. 30 जून) आमदार गोपीचंद पडळकर यांचा सोलापूर दौरा होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यावर बोचरी टीका केली होती. यावर सोलापुरात राष्ट्रवादीच्या नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली होती. त्याच दिवशी सायंकाळी रोजी गोपीचंद पडळकर घोंगडी बैठकीला जाताना भवानी पेठ येथील मड्डी वस्ती या ठिकाणी दोन तरुणांनी पडळकर यांच्या वाहनांवर दगडफेक करून हल्ला केला होता. अमित सुरवसे आणि निलेश क्षीरसागर अशी दोन्ही तरुणांची नावे निष्पन्न झाली होती. या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी (दि. 3 जुलै) सकाळी सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडळकरांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे. त्याबाबत अधिकृत माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी माध्यमांना दिली.
बक्षी हिप्परगा येथून अटक
पडळकरांच्या वाहनावर दगडफेक करताना अमित सोबत निलेश क्षीरसागर हा तरुण देखील होता. दगडफेक केल्यानंतर अमित व निलेश दोघे फरार होते. हल्ल्यानंतर सोलापूर शहर पोलिसांचे पथक निलेश आणि अमित याला अटक करण्यासाठी तपास करत होते. अमित सुरवसे आणि निलेश क्षीरसागर हे दोघे दहिटणे परिसरातील बक्षी हिप्परगा येथे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना शनिवारी सकाळी मिळाली होती. पोलिसांनी ताबडतोब दोघांना अटक करून गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.
हेही वाचा -रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
अमित सुरवसे हा पोलिसांचा मुलगा
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगड फेकून पळ काढणार अमित सुरवसे हा एका पोलिसाचा मुलगा आहे. म्हाळप्पा सुरवसे, असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात ते कार्यरत आहेत. आपला मुलगा कुणाचा कट्टर समर्थक असेल आणि असे कृत्य करेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. ज्यावेळी अमित सुरवसेला अटक करण्यात आली त्यावेळी गुन्हे शाखेच्या कार्यालयात अमित याचे वडील म्हाळप्पा देखील आले होते. अमित व त्याचा सहकारी निलेश क्षीरसागर हे दोघे उच्च शिक्षित तरुण आहे.