सोलापूर- शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत 1 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नियाज सय्यदसाब सगरी (वय 25 वर्षे, रा. सद्गुरु नगर, होटगी रोड, सोलापूर), रियाज सय्यदसाब सगरी (वय 32 वर्षे, रा. सद्गुरू नगर, होटगी रोड, सोलापूर), रिक्षा चालक रोहित राजू बनसोडे (वय 26 वर्षे, रा. भारत माता नगर, होटगी रोड, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रविवारी (दि. 6 सप्टें.) शहर गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आसरा चौक येथील मैदानाच्या बाजूला हकीम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरून त्याचा काळाबाजार करत असल्याची त्यांनी खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. नियाज सगरी, रियाज सगरी हे दोघे भाऊ राजू बनसोडे याच्या रिक्षामध्ये घरगुती गॅस भरत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपींना पकडून कारवाई केली.