सोलापूर- शहरात असलेल्या संभाजी तलाव शेजारी पुलावर मासे वाहून नेणारा ट्रक शनिवारी (दि. 8 मे) सकाळी उलटला. यामुळे ट्रकमधील मासे ट्रकच्या बाहेर फेकले गेले. याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची कंबर तलाव परिसरात झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.
ट्रक सांडपाण्याच्या शेजारी उलटल्याने बहुतांश मासे सांडपाण्यात पडले होते. तरीही नागरिकांनी घाण पाण्यातील मासे घेण्यासाठी गटारीत उतरून मासे गोळा केले. या ठिकाणी गर्दी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत नागरिकांना हुसकावून लावले. हा सर्व प्रकार ट्रक चालक हताश होऊन पाहत होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
मांगूर मासे घेऊन नागपूरला निघाला होता ट्रक
मांगूर जातीचे मासे ट्रक घेऊन जात होता. रात्रभर ट्रक चालवल्याने चालकाला झोपेची डुलकी लागत होती. संभाजी तलाव (कंबर तलाव) परिसरात सकाळी चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटला. त्यामुळे तलाव परिसरातील दुभाजकाला ट्रक धडकला आणि ट्रकमधील मासे सांडपाण्यात पडले.