सोलापूर : मटका किंग व भाजपा नगरसेवक सुनील कामाठी अद्यापदेखील फरारच आहे. संपूर्ण क्राईम ब्रँच टीम मटका किंगच्या शोधात आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व डीसीपी बापू बांगर व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, एसीपी अभय डोंगरे हे सुनील कामाठी प्रकरणात विशेष लक्ष देत आहेत.
सोमवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पोलिसांना न्यू पाच्छा पेठ येथील एका इमारतीत मटका (आकडा) मोठ्या प्रमाणात चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पळापळ झाली होती. या पळापळीत परवेज इनामदार या इसमाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूमुळे कारवाईस वेगळे वळण लागले. संपूर्ण सोलापूर शहर व जिल्हा या घटनेने हादरून गेला होता. पोलिसांनी या कारवाईदरम्यान संपूर्ण शोध व तपास केला असता हा मटका व्यवसाय भाजपचे विद्यमान नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस शिपाई स्टीफन स्वामी व इस्माईल मुच्छाले यांचा भागीदारीत असल्याची माहिती समोर आली आहे. व तसेच आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलची देखील भागीदारी असल्याची चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी स्टीफन स्वामी या पोलीस शिपायाला ताब्यात घेत कारवाई केली आहे. तर या कारवाईत एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी सुनील कामाठी अद्यापही फरार आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुनील कामाठीच्या मुसक्या आवळण्या साठी, त्याचा शोध घेण्यासाठी बुधवारी त्याच्या घरची झडती घेतली. घरात असलेल्या नातेवाईकांची कसून तपासणी केली. त्यांची कागदपत्रे तपासली. पंरतु घरात देखील मटका किंग आढळला नाही. सोलापूर क्राईम ब्रँचने मटका किंग सुनील कामाठी याला पकडण्यासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी बोलताना दिली.
प्रेस नोटमधील जाहीर खुलास्यानुसार न्यू पाच्छा पेठ येथील इमारतीत जवळपास दोन कोटींची उलाढाल होत होती. यावरून हे सिद्ध झाले की, सोलापूरमध्ये अवैध व्यवसाय कोटींच्या घरात सुरू होते. यामध्ये अजून एका पोलिसाचा समावेश असल्याची चर्चा होत असून त्या पोलिसाचा शोध करून त्यावर कारवाई केली जाणार का असा प्रश्न पडला आहे. तसेच सुनील कामाठी हा पोलिसांना सापडणार की, नाही असाही प्रश्न पडला आहे. कारण या मटका किंगचे लागेबांधे वरीष्ठ पातळीवर देखील आहेत.