सोलापूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ( Punyashlok Ahilya Devi Holkar ) विद्यापीठाने परीक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ( Solapur University Exam Date ) 20 जून ऐवजी 14 जुलै पासून सुरू होणार आहेत. तसेच वर्णनात्मक परीक्षा ऐवजी वस्तुनिष्ठ परीक्षा व ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती परीक्षा नियंत्रण मूल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. आज शनिवारी 18 जून रोजी सोलापूर विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी व एबीव्हीपी आणि एनएसयुआय कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारसमोर मोठे आंदोलन केले होते. आषाढ वारी 10 जुलै रोजी होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या परीक्षा या 20 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार होत्या. या परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि वारी नंतरच परीक्षा घेण्यात याव्या, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी व विविध संघटनांनी यापूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेबाबत विरोध केला होता. सर्वस्तरातून आलेल्या या मागणीला ग्राह्य धरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने परिक्षेबाबत मोठा बदल केला आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार तसेच बीओएसच्या प्रश्नपत्रिका रचनेनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन व डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार होत्या. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने आज शनिवारी 18 जून रोजी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2022 पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील.