सोलापूर (पंढरपूर) - मकाई कारखान्याने 2 जून 2018 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीतील कामगारांच्या हिश्शाची भविष्य निर्वाह निधी रक्कम खात्यात जमा न करता अपहार केला. अशी तक्रार मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याविरोधात दाखल झाली. त्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात बागल गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बागल यांच्या विरोधात सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मकाई कारखान्याने कामगारांच्या पगारातून 32 लाख 67 हजार 986 रुपयांची रक्कम कपात करूनही ती भविष्य निर्वाह खात्यात न भरल्याने, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रतीक रामचंद्र लाखोले (रा. पोस्टल कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे.
करमाळा येथील राजकारणाला वेगळे वळण -
करमाळा येथील विकास सोसायटी व ग्रामपंचायत येथे बागल गटाची सत्ता आहे. दिग्विजय बागल यांच्या आई शामलताई बागल या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारही राहिल्या आहेत. तसेच 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये करमाळा मतदारसंघांमधून दिग्विजय बागल यांच्या भगिनी रश्मी बागल यांनी शिवसेनेकडून आपले नशीब आजमावले होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे करमाळा येथील राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.
उलटसुलट चर्चेला उधाण -
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. गेल्यावर्षी आदिनाथ व मकाई दोन्ही कारखाने बंद होते. यावर्षी आदिनाथ हा भाडेतत्त्वावर देण्याचा बागल यांनी निर्णय घेतला आहे. तर मोठ्या प्रयत्नानंतर मकाई कारखाना सुरू करण्यात आला आहे. एकीकडे मकाई वाचविण्यासाठी आदिनाथ गहाण ठेवण्याचा आरोप बागल कुटुंबीयांवर होत आहे. तर दुसरीकडे कामगाराच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेत अपहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.