सोलापूर- सेन्टर फॉर ट्रेड युनियन(सिटू)च्या वतीने गुरुवारी (दि. 3 जून) सकाळी विडी कामगार महिला आणि यंत्रमाग कामगार यांना सोबत घेऊन माजी आमदार नरसय्या आडम यांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.
सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केल्याने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर भयंकर अशा तणावाखाली आले आहेत. सोलापुरात निर्बंध शिथिल संबंधित आदेश काढण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर शहरातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे .विडी उद्योग आणि यंत्रमाग उद्योग सुरू करा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
चोवीस तासांत राज्य सरकारकडून आदेश काढू
माजी आमदार नरसय्या आडम ,सिटूचे राज्य सचिव एम. एच.शेख, नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. तसेच पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. आयुक्त पी शिवशंकर यांनी चोवीस तासांत राज्य सरकार निर्णय घेईल व निर्बंधात शिथिलतेचा निर्णय लवकरच येईल, संयम राखा, असे आश्वासन दिले.
विडी उद्योग वर्क फ्रॉम होम असूनही विडी उद्योग बंद
सोलापुरात जवळपास 40 ते 50 हजार महिला विडी उद्योगावर अवलंबून आहेत. विडी कामगार महिलांचे सर्व काम हे घरी बसून असते तर मग विडी उद्योग बंद का केले, असा सवाल आंदोलनात सहभागी झालेल्या महिला विडी कामगारांनी केला आहे. दोन महिन्यांपासून सोलापुरात निर्बंध लावण्यात आले आहेत. सर्व व्यवहार बंद आहेत. विडी कारखाने बंद आहेत. नियमावलीमुळे उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. कोरोनाने मरण्यापूर्वी उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली.
हेही वाचा -व्यापाऱ्यांचा ठिय्या : पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात