सोलापूर -जुळे सोलापूर ही सोलापुरातील अतिशय उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी छापा कारवाई करून टी-20 विश्वचषकाच्या मॅचेसवर सट्टा घेणाऱ्या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक केले आहे. या कारवाई दरम्यान 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा किंवा टी 20 विश्वचषक क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणाऱ्याचा मोठे रॅकेट असल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. लवकरच या रॅकेटच देखील पर्दाफाश करून मोठ्या माश्याना बेड्या ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.
सेमिफायनलच्या क्रिकेट मॅचेसवर सट्टा घेणारे उच्चशिक्षित -
पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की, जुळे सोलापुरातील शालिनी ऑर्केड या अपार्टमेंटमध्ये सट्टा घेतला जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या सेमिफायनल क्रिकेट मॅचेस वर लाखो रुपयांची सट्टा बाजारातील उलाढाल होत आहे. भरारी पथकाने ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाण्याची मदत घेतली आणि बुधवारी रात्री कारवाई केली. कारवाई दरम्यान चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, चौघेही उच्चशिक्षित तरुण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी अमोघ आनंद साखरे (24, रा महादेव गल्ली, मंगळवार पेठ, सोलापूर), नागेश सुभाष येळमेली (33, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर), शिवाजी पांडुरंग हक्के (32,रा. मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर), प्रभाकर राजशेखर उपासे (28, रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांना अटक करण्यात आले आहे. सध्या या तरुणांची 14 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कारवाई दरम्यान अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त -
भरारी पथक आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सट्टा घेत असलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅटची संपूर्ण झडती घेतली. या झडती दरम्यान 17 मोबाईल हँडसेट, 2 लॅपटॉप, 1 नोटबुक, 1 हॉटमशीन, 14 हजार रुपयांची रोखड असा एकूण 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.