पंढरपूर -उजनी जलाशयातील पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे. गेल्या दीड महिन्यापासून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून उजनी बाबत आंदोलने केली जात आहेत. मात्र राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूरकरांची दिशाभूल करण्यासाठी पाच टीएमसी पाणी बाबत मंजूर झालेला आदेश रद्द करत असल्याचे सांगितले. त्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी पाच दिवस सांगितले होते. मात्र अद्यापही आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे उजनी धरण पाणी बचाव समितीकडून उद्यापासून जिल्हाभरात आंदोलने केली जाणार आहेत, अशी माहिती उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
'मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच मंत्र्यांकडून दिशाभूल'
उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिल रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर त्या पाच टीएमसी पाण्यासाठी भाजप, शेतकरी संघटना व इतर संघटनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आली होती. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांची राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील हे दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणी योग्य तो न्याय करावा अशी मागणीही खूपसे पाटील यांनी केली.