सोलापूर - शहराचे सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे बुधवारी निधन झाले. ते जीममध्ये व्यायामासाठी गेले असताना, त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली आहे. एका चांगल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -राज्यातील 1581 आजी-माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हे
- सुहास भोसले यांच्याकडे डिव्हिजन -1चा चार्ज होता-
सुहास भोसले हे डिव्हिजन क्रमांक एक याठिकाणी सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. जेलरोड पोलीस ठाण्यात हे कार्यालय आहे. 1 एप्रिल 2021 रोजी ते अमरावतीहून सोलापुरात रुजू झाले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 56 वर्ष असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच अश्विनी हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.
- जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू -
बुधवारी सकाळी सुहास भोसले हे जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. व्यायाम करताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. जीमच्या व्यवस्थापकांनी ताबडतोब त्यांच्या छातीवर पंपिंग करून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी सुहास भोसले यांना मृत घोषित केले.
हेही वाचा -राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार, राज्य सरकारचे केंद्र सरकारला जशास तसे उत्तर