सोलापूर- अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घ्यावे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी सोलापुरात आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
अंगणवाडी सेविकांचा सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Collector Office
शासकीय कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घ्यावे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला.
![अंगणवाडी सेविकांचा सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4020424-thumbnail-3x2-anganvadi.jpg)
पार्क चौकातील चार पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिद्धेश्वर प्रशालेसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. सरला चाबुकस्वार आणि शिवमणी गायकवाड यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी सप्टेंबर 2018 पासून प्रलंबित असलेली मध्यवर्ती सरकारी मानधनवाढीची रक्कम फरकासहित मिळावी. सेवा निवृत्तीच्या वेळी मिळत असलेल्या मानधनाच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून द्यावी,अशीही मागणी अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली.
सरकारच्या वतीने जुलै 2019 पासून मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने मासिक अहवाल मागविण्यात येत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. ती दूर करावी अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली. अंगणवाडी सेविकांचा शिस्तबद्ध निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.