पंढरपूर -संभाव्य अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करून तसेच समन्वय ठेवून सतर्क राहावे, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.
'आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे' 'कोरोना नियमांचे पालन करावे'
पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून काही प्रमाणात शिथिलता दिली गेली आहे. मात्र व्यापारी वर्ग व नागरिकांनी एकमेकांपासून लांब राहिले पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवून सर्व व्यवहार सुरळीत पार पडावेत. सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
'सर्व यंत्रणांनी पूर्व नियोजन करावे'
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी संभाव्य उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्व नियोजन करावे. पूरपरिस्थितीमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील, याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा, असे आवाहन प्रांताधिकारी यांनी नागरिकांना केले आहे.
'तालुक्यातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे'
तालुक्यातील ग्रामस्तरीय समितीने सतर्क रहावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे तसेच तालुक्यातील प्रत्येक गावची लोकसंख्या, शाळा-कॉलेज, मंगलकार्यालय, रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, खासगी दवाखाने आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहोणारे व्यक्ती, औषध दुकाने यांची माहिती संकलित करावी, अशा सूचनाही ढोले यांनी दिल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले.
हेही वाचा -इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई